आमदार संजय केळकर यांची स्पष्टोक्ती..
ठाणे 16 : वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक वर्षे मंत्रिपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास खात्याकडून उत्तर मिळाले तर वाद टळतील. मात्र त्याऐवजी वेगळेच वळण दिले जात असल्याचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासकीय राजवट असताना नवी मुंबई महापालिकेच्या अनामत रकमा आणि भूखंडाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विचारली आहे. श्री.नाईक हे अनेक वर्षे सत्तेत होते, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अनेक वर्षे भूषविले आहे. नवी मुंबईत २५ वर्षे त्यांनी एकहाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास विभागाने उत्तर द्यायला हवे. मात्र त्याऐवजी वेगळे वळण दिले जात आहे. आवश्यक माहिती मिळाली तर वाद टाळता येऊ शकेल. जनतेने विकासासाठी महायुतीला सत्ता दिली आहे. अशा वादामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता अधिक असल्याचेही श्री.केळकर म्हणाले.
श्री.केळकर पुढे म्हणाले, एकमेकांवर व्यक्तिशः टीका करणे टाळायला हवे. मतभेद असावेत, पण मनभेद असू नये, असे स्पष्ट करत श्री.केळकर यांनी एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरज व्यक्त केली.
ठाणेकरांच्या हितासाठी मी देखील अधिवेशनात पुराव्यानिशी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. काही चुका झाल्या असतील तर चौकशी लावण्याची गरज आहे. त्यामुळे ठाणेकरांमधील संशय दूर होईल, असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.केळकर म्हणाले, महायुतीबाबतचे कोणतेही निर्णय हे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात अमित शहा वेळोवेळी घेत असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विकासकाकडून झालेली फसवणूक, ठाणे महापालिकेतील वारसा हक्क प्रकरण, अन्न-औषध प्रशासन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांबाबत तक्रार, सोसायटीमध्ये निवासी वापराचा वाणिज्य वापर, पथदिवे आदींबाबत निवेदने प्राप्त झाली. यावर श्री.केळकर यांनी तत्काळ संबंधितांशी बोलून चर्चा केली तर काही प्रश्नांबाबत पाठपुरावा करून संबंधितांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक दीपक जाधव, योगेश भंडारी, दिलीप कंकाळे, राजेश ठाकरे, मेघनाथ घरत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
