ठाणे 18 : शासनाच्या जनजागृती उपक्रमांतर्गत इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूविरोधी जनजागृती सत्राचे आयोजन न्यू कळवा हायस्कूल येथील कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच (14 ऑगस्ट) करण्यात आले. तंबाखूच्या सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके तसेच तंबाखूपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूचे विविध प्रकार, त्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम आणि दीर्घकाळ तंबाखू सेवनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती देण्यात आली. ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी तंबाखूचा आधार घेऊ नये, तसेच केवळ साहस, कुतूहल किंवा मित्रांच्या आग्रहामुळे तंबाखूचे सेवन सुरू करू नये, असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
आजच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांवर मित्रपरिवाराचा आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता ठामपणे ‘तंबाखूला नकार’ देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. स्वतः तंबाखूपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी COTPA Act (Cigarettes and Other Tobacco Products Act) मधील महत्त्वाच्या तरतुदींबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व सेवनासंदर्भातील कायदेशीर बाबींची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
तंबाखू किंवा इतर व्यसनांपासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना योग्य समुपदेशन व उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी रुग्णालयात De-addiction OPD (व्यसनमुक्ती बाह्यरुग्ण विभाग) उपलब्ध असून, तंबाखू किंवा इतर व्यसनाधीन पदार्थ सोडण्यासाठी इच्छुक व्यक्तींना येथे समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन मिळू शकते, अशी माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. व्यसन ही केवळ सवय नसून त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य वेळी मदत घेणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
हे जनजागृती सत्र UG विद्यार्थी सौम्या व आदित्य तसेच PG विद्यार्थी डॉ. शुभम यांनी घेतले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत तंबाखूचे दुष्परिणाम, व्यसनाचे सामाजिक व वैयक्तिक परिणाम आणि व्यसनापासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विषयाबाबत विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम याचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना व्यसनमुक्त आणि निरोगी जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या दृष्टीने हे जनजागृती सत्र अत्यंत उपयुक्त ठरले. “तंबाखूला नाही, निरोगी जीवनाला होकार!” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत सत्राची सांगता करण्यात आली.
