Sunday, July 19 2026 4:06 am

डेटा सेंटरचा विषय राज्य शासनाकडे वर्ग होणार – संयुक्त बैठकीत आयुक्त सौरव राव यांचे स्पष्टीकरण

ठाणे 18 – वेक अप ठाणेकर, स्थानिक रहिवाशी , अमेझाॅन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठामपा आयुक्त सौरव राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अमेझाॅन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेरीस आयुक्त सौरव राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, वेक अप ठाणेकर आपल्या आंदोलनावर ठाम असून शनिवारी दहा वाजता डेटा सेंटर परिसरात निदर्शने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे, आदी मुद्दय़ांवर अमेझाॅनचे प्रतिनिधी आणि वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यातून कोणताच मार्ग न निघाल्याने मंत्रालयात बैठक घेण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले.

दरम्यान मत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी 10.00 वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर, बाळकूम येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली.