आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..
ठाणे 08 – ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या स्थापनेपासून ‘एएनएम’ (प्रसाविका) पदावरून ‘जीएनएम’ (स्टाफ नर्स) पदावर पदोन्नती देण्याची कोणतीही तरतूद सेवाप्रवेश नियमावलीत अस्तित्वात नव्हती. मात्र, आमदार संजय केळकर यांनी मंत्रालय तसेच ठाणे महानगरपालिका स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगर विकास विभागाने सेवाप्रवेश नियमात सुधारणा करून २५टक्के पदे पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
सेवाप्रवेश नियमातील सुधारणा शासनाच्या सुधारित नियमांनुसार, ठाणे महापालिकेतील नर्स मिडवाईफ/परिचारिका/स्टाफ नर्स (वर्ग-३) संवर्गासाठी ७५टक्के पदे सरळसेवेने भरली जातील. २५टक्के पदे महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पात्र प्रसाविकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील. यासाठी प्रसाविका पदावरील किमान तीन वर्षांचा अनुभव व आवश्यक शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरली जाईल.
ठाणे महापालिकेत जीएनएम संवर्गाची एकूण मंजूर पदे ६४० आहेत. २५टक्के कोट्यानुसार आता तब्बल १६० पदे पदोन्नतीसाठी राखीव झाली आहेत. यापूर्वी सरळसेवा पदभरतीसाठी ४५७ पदे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, पदोन्नतीचा कोटा निश्चित झाल्यामुळे आता पदभरती आणि पदोन्नतीमध्ये समतोल साधला गेला आहे. परिणामी, थेट पदभरतीमुळे सध्या पालिकेत कंत्राटी तत्त्वावर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या जीएनएम परिचारिकांवर ओढवणारा संभाव्य सेवा समाप्तीचा धोका टळला असून त्यांची सेवा सुरक्षित राहिली आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे पहिल्या टप्प्यात सध्या सेवेत असलेल्या ७ ते १० पात्र कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. तसेच येणाऱ्या काळात अनेक अनुभवी एएनएम कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीची दारे खुली झाली आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागणीचा यशस्वी निपटारा करून आरोग्य कर्मचाऱ्यांचे हक्क मिळवून दिल्याबद्दल सर्व परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आमदार संजय केळकर यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
