अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार संजय केळकर यांनी केल्या सूचना.
ठाणे 13 : सर्व घटकांना आणि क्षेत्रांना दिलासा देणारा, समतोल अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया देताना आमदार संजय केळकर यांनी कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली. जुन्या इमारतींमधील रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा, कंत्राटी कामगार, घरेलू कामगार आणि बंद कंपन्यांतील कामगारांना संरक्षित करण्यासाठी ठोस धोरण आणि ठाण्याला १०० एमएलडी पाणी आदी गरजांकडे विशेष लक्ष देण्याची मागणीही त्यांनी अधिवेशनात केली.
सर्वसामान्य घटकांचा आर्थिक स्तर उंचावणारा, सर्व समाज घटकांना दिलासा देणारा आणि सर्व क्षेत्रांतील विकासाला चालना देणारा समतोल अर्थसंकल्प अशी प्रतिक्रया आमदार संजय केळकर यांनी देत विरोधकांच्या नरेटिव्हचे पितळ उघडे पाडले. कृषि, उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे सांगताना श्री.केळकर यांनी धर्मांतर विरोधी विधेयकाबाबत राज्य सरकारचे आभारही मानले. गोसेवा करणाऱ्या संस्थांना अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना गोवंशाला देखील अनुदान मिळावे, गोसेवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी योजना आखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
ठाणे-मुंबईत बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून नवीन जलमार्गांमुळे आणखी तिप्पट प्रवाशांची वाढ होणार असल्याचे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग, ऐरोली-कटाई उन्नत मार्ग भाग ३, यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद यामुळे वाहतूक व्यवस्थेबरोबरच अर्थव्यवस्थेला देखिल चालना मिळणार आहे. बाळकुम-गायमुख रस्ता, पनवेल कर्जत प्रकल्प यामुळे वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतूक कोंडीला देखिल तोंड देणे शक्य होणार असल्याचा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार संजय केळकर यांनी काही सूचनाही केल्या आहेत. ठाणे महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजारो कंत्राटी कामगार काम करत असून त्यांना किमान वेतनही मिळत नाही. कंत्राटदारांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. घरेलू कामगारांचाही किमान वेतनाचा प्रश्न आहे. बंद पडलेल्या कंपन्यांमधील कामगारांना २०-२० वर्षे थकबाकी मिळत नाही, त्यामुळे या कामगारांसाठी कठोर धोरणात्मक योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था निःस्वार्थपणे गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहे. राज्यात लाखो शिवभक्त आणि संस्था हे काम कोणतीही अपेक्षा न बाळगता करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असंरक्षित गड किल्ल्यांवर अतिक्रमणे होत असून या गड-किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संस्थांना देण्याची सूचना श्री. केळकर यांनी केली.
ठाणे शहरात पाणी टंचाई, फेरीवाले, वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्या भेडसावत असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस बळ अपुरे असून ते वाढवण्याची गरज आहे. जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करताना विकासकांकडून फसवणूक होते. त्या रहिवाशांना संरक्षित करून त्यांचा हक्क अबाधित ठेवण्याची गरज असल्याचे श्री. केळकर म्हणाले.
ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असून त्या तुलनेत पाणी कमी मिळत आहे. सध्या ठाण्याला १०० एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज असून त्यातील ५० एमएलडी पाणीही मिळत नसल्याचे सांगून शहराला १०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची सूचनाही आमदार संजय केळकर यांनी केली.
