लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गढूळ आणि दूषित पाण्याची समस्या ऐकताच पालिका आयुक्तांना धक्का
ठाणे, 18 – ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १३ संत ज्ञानेश्वर नगर मध्ये चक्क गढुळ व अशुध्द पाण्याच्या पुरवठा होत असल्याने नागरीक हैराण आहेत. लुईसवाडी, वैतीवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगरसह आजूबाजूच्या परिसरातील नळाना गेली २५ वर्षे गढूळ आणि दुर्गधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने संतप्त रहिवाश्यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेवर धडक दिली. गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याचे मोर्चेकऱ्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना सांगितले. ही समस्या ऐकताच आयुक्तांना धक्का बसला.
गेल्या अनेक वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर तसेच ज्ञानेश्वर नगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनेच्या माध्यमातून सुमारे २२.५० दश लक्ष पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र दर पावसाळयात येथील नागरिकांना अशुध्द पाणी पाजले जाते. या पाण्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना विविध विकार होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. पावसामुळे माती मिश्रित पिवळसर पाणी ठाणेकरांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. निवडणुका आल्या की पाण्याच्या नवीन पाईप लाईन टाकण्याचे आश्वासन देण्यात येते. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी (गणेश) खूस्पे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ठाणे पालिका मुख्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. “एकच मागणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी”, स्वच्छ पाणी द्या जनतेचा विश्वास जिंका असे फलक तसेच हातामध्ये अशुद्ध पाण्याचा बॉटल हातात घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने नागरीक सामील झाले होते. यावेळी संजय दळवी, प्रशांत पालांडे, तात्याराम झेंडे, मछिंद्र नागीमे, दिनेश औटी, अमोल हिंगे, अशोक जाधव, वैशाली घाटवळ, सुनिता जाधव, कविता भोसले आदी जण उपस्थित होते..
१७ एमएलडी गरज असताना फक्त ७ एमएलडी पाणी
संत ज्ञानेश्वर नगर व डॉ. गंगाधर नगर येथील काही भगात तानसा पाईपलाईन व समतानगर जलकुंभ या दोन ठिकाणाहून पाणी पुरवठा होत आहे. सध्या समतानगर जलकुंभात अपुरा पाणी पुरवठा म्हणजे ७ ते ८ एमएलडी पाणी येत असून तेथे १७ एमएलडी पाण्याची गरज आहे. समतानगर जलकुभांत पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाल्यास वायरमेन वाडी पंचपरमेश्वर मंदिर परिसर, सोमेश्वर सोसायटी, अशोक मेडीकल परिसर, पाईपलाईन परिसर, शंकर मंदिर परिसर ते घरकुल सोसायटी पर्यंतच्या परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकतो असे यावेळी नगरसेवक शहाजी (गणेश) खूस्पे यांनी आयुक्तांना सांगितले.
रॉ वॉटर पुरवठा शुध्द पाण्याच्या लाईनवर शिफ्ट करा
तानसा पाईपलाईन वरून रॉ वॉटर पुरवठा होत आहे. सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तानसा पाईपलाईनच्या शेजारी असलेल्या वैतरणा या शुध्द पाण्याच्या लाईनवर पाणी कनेक्शन शिफ्ट केल्यास डॉ. गंगाधर नगर, शिवसेना शाखा परिसर, बौध्द विहार परिसर, गगनगिरी सोसायटी, सिध्दगिरी सोसायटी व आजुबाजूच्या परिसरातील दुषित पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असे यावेळी खूस्पे यांनी सांगितले.
अन् आयुक्त चकित झाले
प्रभाग क्रमांक १३ मधील संत ज्ञानेश्वर नगर वासियांना गढूळ पाणी पिव्यावे लागते हे ऐकून आयुक्तांना आश्चर्य वाटले. दरम्यान, प्रक्रिया न केलेले पाणी या परिसरात सोडले जाते असे मोर्चेकरांनी आयुक्तांना सांगितल्यानंतर आयुक्त देखील चकित झाले. ही समस्या अत्यंत गंभीर असून तातडीने अंमलबजावणी करतो असे आश्वासन ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी समस्त मोर्चेकरांना दिले.
