Sunday, December 21 2025 11:08 pm
latest

‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रम तत्काळ पाठपुराव्यामुळे लोकप्रिय..

आमदार संजय केळकर यांचा ८१वा उपक्रम उत्साहात..

ठाणे, 17 आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा ८१वा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे महापालिका, राज्य शासन, महसूल विभाग आदी विभागांतील प्रश्न तसेच पाणी टंचाई, बिल्डरकडून फसवणूक, सफाई कामगारांचा वारसा हक्क अशा विविध समस्यांबाबत अर्ज प्राप्त झाले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीपूर्वीचा हा अखेरचा उपक्रम होता.

आठवड्यातून सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात केवळ ठाण शहरच नाही तर उर्वरित जिल्ह्यासह मुंबई तसेच रायगड, रत्नागिरी येथून नागरिक समस्या घेऊन येत आहेत. आमदार संजय केळकर हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तत्काळ फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत, समस्या मार्गी लावत असल्याने या उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. केवळ फोनवरून अधिकाऱ्यांशी चर्चा न करता प्रसंगी त्याचा पाठपुरावा करून प्रश्नांचा निकाल लावत असल्याने या उपक्रमाला मोठा जनाधार मिळाल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. ८१व्या उपक्रमात डीआरडी विभागासंबंधित प्रकरणाचा सकारात्मक निकाल लागला. एक आठवड्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना याबाबत सूचना दिल्या होत्या, अशी माहितीही श्री.केळकर यांनी दिली.

सोमवारी झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात सफाई कामगारांचा वारसा हक्क, पाणी टंचाई, विकासकाकडून झालेली फसवणूक, शिधावाटप कार्यालय, कंत्राटदारांकडून रखडलेले वेतन, मजूर-कामगारांचा रखडलेला मोबदला, विद्यार्थ्यांची फसवणूक, आदी समस्यांबाबत नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाले. यावेळी भाजपाचे संतोष साळुंखे, महेश कदम, युवा मोर्चाचे सुरज दळवी उपस्थित होते.

जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम नवीन नसून जुनाच आहे. भाजपच्या स्टेशन रोड येथील कार्यालयात लोकांच्या तक्रारींचे निरसन केले जात होते. तोच पायंडा आजही जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या रूपाने सुरू असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक काळात हा उपक्रम घेत येणार नसला तरी निवडणुकीनंतरही हा उपक्रम नव्या जोमाने सुरू राहील, असेही श्री. केळकर यांनी सांगितले.