Wednesday, July 8 2026 4:25 pm

चॅरिटी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार; जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम राबविणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 08: चॅरिटी रुग्णालयांकडून नियमांचे पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरील समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तर सदस्य नीलम गोऱ्हे, परिणय फुके, चंद्रकांत रघुवंशी, राजीव पोतदार, चित्रा वाघ, बच्चू कडू, निरंजन डावखरे, भाई जगताप, प्रमोद जठार, मनीषा कायंदे यांनी यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री देसाई म्हणाले की, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात चॅरिटी रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी करावी. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीने विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारल्याच्या तक्रारींवरही शासन गांभीर्याने लक्ष ठेवत असून आवश्यकतेनुसार अशा प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील नेमण्याचाही विचार केला जाईल तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणे अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून, तपासणीनंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, ग्लोबल हॉस्पिटलबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून २१ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. रुग्णालयाची नर्सिंग नोंदणी रद्द करण्याची आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट रद्द करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुढील निर्णय २१ जुलैनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन रुग्णालयाला देण्यात आलेला अतिरिक्त एफएसआय परत घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल. चॅरिटी रुग्णालयांनी मोफत उपचारांसंदर्भातील माहिती दर्शविणारे डॅशबोर्ड लावणे बंधनकारक असून अनेक रुग्णालयांनी अद्याप त्याचे पालन केलेले नाही, अशा रुग्णालयांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या ‘आरोग्य दूतां’मार्फत याची तपासणी केली जाणार आहे.