Wednesday, February 11 2026 5:58 am

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव – आ. संजय केळकर

 

ठाण्यात कोकण ग्रामविकास मंडळाच्या २७ व्या मालवणी महोत्सवाचा दणक्यात शुभारंभ

ठाणे, 9 – ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक अग्नीहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे. असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले.
   कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी ०८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी, शिवाईनगर उन्नती मैदान येथे “मालवणी महोत्सव-२०२६” भव्य आयोजन केले आहे. रविवारी (ता.०८ फेब्रु.) रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, उषा वाघ,सुरेश कांबळे, अनिता ठाकुर, दिपक जाधव, अनिता यादव,विमल भोईर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदुराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. केळकर आणि आ. डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच, यंदा प्रथमच उभारलेल्या स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. केळकर यांनी, कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कलासंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतुने गेली २७ वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असुन आता ते आयोजकावरून नगरसेवक बनल्याचे सांगितले. केवळ खवय्यांसाठी नाही तर, ह्या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचे आ. केळकर म्हणाले. तर,आ.निरंजन डावखरे यांनी, सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातुन गेली २७ वर्षे कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असुन एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुकोद्गार काढले.