मुंबई, 07 : कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण, सक्षम पर्यवेक्षक आणि नियमित तपासणी बंधनकारक करण्यासाठी कडक कायदे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. अपघातग्रस्त कामगारांच्या कुटुंबांना अधिक नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित कंपन्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदस्य भास्कर जाधव यांनी धाराशिव जिल्ह्यातील फटाके कारखान्यांमध्ये झलोल्या अपघातासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
याबाबत अधिक माहिती देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले, संतोष फायरवर्क्स (२४ सप्टेंबर २०२४) आणि बाबा फायरवर्क्स (२९ जानेवारी २०२५) येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मृत कामगारांना अनुक्रमे २ लाख आणि ६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
डिझायर फायरवर्क्स या कारखान्यात उरलेले रासायनिक अवशेष साठून आग लागली, तर बालाजी फायरवर्क्समध्ये मिश्रण मिक्सिंग रूममध्ये राहिल्याने तापमान वाढून आग लागल्याचे प्राथमिक तपासात आढळले. मात्र या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील फटाका कारखान्यांमध्ये झालेल्या अपघातांप्रकरणी संबंधित कारखान्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून कामगार विभागाकडून खटले दाखल करण्यात आले आहेत.
स्फोटक पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, महसूल व कामगार विभागाकडून संयुक्त तपासण्या नियमित करण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
