चंद्रपूरमध्येही कौशल्य विकास केंद्र
मुंबई, 07 : राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असून त्याचा मोठा लाभ राज्यातील युवकांना होणार आहे. तसेच पुढील टप्प्यात चंद्रपूर येथे ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. सदस्य राजेश पवार यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, राज्यात उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून आतापर्यंत पाच कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात आली आहेत. टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने आणखी सहा केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत चंद्रपूर येथे कौशल्य विकास केंद्रासंदर्भात बैठक घेण्यात येईल.
१९६८ पासून स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने धोरण राबविले जात असून उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यांनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योग सुरू होऊन स्थानिकांना रोजगार मिळण्यावर भर देण्यात येत असून यासंदर्भात उद्योग विभागामार्फत आढावा घेण्यात येईल. तसेच उद्योजकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पातळीवरील उद्योगमित्र समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्याबाबत सूचना देण्यात येतील. या समित्यांमध्ये विधिमंडळ सदस्यांचा समावेश करण्यात येईल. तसेच राज्यातील रोजगार उपलब्धतेचा विकास आयुक्तांकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचे आदेश देण्यात येतील. याशिवाय उद्योग विभागामार्फत एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजसारखी प्रणाली पुन्हा सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
