Friday, March 13 2026 7:24 pm

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचा ‘हिट ॲक्शन प्लान’ तयार – अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे

 

ठाणे 13  : वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘हिट ॲक्शन प्लान’ (Heat Action Plan) तयार करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट लावणे, , उष्णतेशी संबंधित आजारांवर औषधसाठा उपलब्ध करणे, शहरातील विविध ठिकाणी पाणपोई उभारणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विभागांना उष्णतेच्या लाटेबाबत सूचना देण्यात आल्या. शहरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेचा Heat Action Plan तयार करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपत्कालीन विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागामार्फत शहरभर मोठ्या प्रमाणात पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात येत आहेत. नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी वर्तमानपत्रांद्वारेही जनजागृती केली जात आहे.

याशिवाय रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, कामगार उपआयुक्त कार्यालय, उपआयुक्त शिक्षण, MCHI/CREDAI, हॉल असोसिएशन, इंडस्ट्रियल असोसिएशन, TISSA, मेट्रो, MSRDC, रेल्वे, RTO, महाविद्यालये तसेच विविध स्वयंसेवी संस्था (NGO) यांना उष्णतेच्या लाटेच्या काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रदूषण नियंत्रण कक्षामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रे, मॅटरनिटी हॉस्पिटल तसेच कळवा हॉस्पिटल येथे उष्णतेबाबत जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे तसेच शीत कक्ष (Cooling Room) तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रांमार्फत परिसरातील रहिवासी संकुलांमध्येही जनजागृती केली जात आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनीही उष्णतेशी संबंधित आजारांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागामार्फत शहरातील शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत पोस्टर्स व बॅनर्सद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उष्णतेमुळे पशु व पक्ष्यांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात मातीची पसरट भांडी ठेवून पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी पाणपोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या प्रभागांमध्ये उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो, जसे की मुंब्रा आणि वागळे प्रभाग, त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वी कामाचा भाग म्हणून झाडांची छाटणी करताना उष्णतेचा परिणाम कमी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटेच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.