Monday, December 22 2025 3:44 am
latest

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा

बीड, 27 : बीड जिल्ह्यात नियोजित विमानतळासाठी जमीन देणे, मोजणी करणे, परळी येथे पशुवैद्यकीय महावि‌द्यालयाची उभारणी, परळी-अहिल्यानगर रेल्वेमार्ग आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्हीसीद्वारे दिनांक 25 जून रोजी घेतला. जिल्ह्यात चालू असलेल्या या कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून उर्वरीत कामाबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या महत्त्वाच्या कामांची सद्यस्थिती नमूद केली.

बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा, दगडीशहाजानपूर व आहेर चिंचोली या गावातील 117.04 हेक्टर शासकीय जमीन व 191.28 हेक्टर खासगी अशी एकूण 308.32 हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड यांनी या जागेची पाहणी केली आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे यांनी ही जागा विमानतळासाठी सुयोग्य आहे का, हे तपासण्यासाठी (Pre-feasibility Study) जिल्हा प्रशासनाकडून प्रपत्र -1 मध्ये माहिती मागवून घेतली आहे. तसेच याबाबतच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुपये 40.32 लक्ष इतका निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान वि‌द्यापीठ, नागपूर अंतर्गत परळी (वै.) येथे पशुवै‌द्यकीय महाविद्यालयाची उभारणी होत आहे. या महावि‌द्यालयासाठी मौजे लोणी तालुका परळी येथे 8.80 हेक्टर व परळी येथे 20 हेक्टर अशी 28.80 हेक्टर जमीन प्रदान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या जागेची पाहणी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे. तसेच ही जमीन प्रदान करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिप्रायसुद्धा शासनाकडे सादर करण्यात आले आहे. ही जमीन विद्यापीठाकडे वर्ग झाल्यानंतर सदरील ठिकाणी पशुवैद्यकीय महावि‌द्यालयाची उभारणी सुरू होईल.