Monday, June 29 2026 12:36 pm

अवैध गौण खनिज उत्खनन रोखणे व कारवाईसाठी स्वतंत्र टास्क फोर्स – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 29 : अवैध गौण खनिज उत्खननाची शासनाने गंभीर दखल घेतली असून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी; तसेच अशा प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य नाना पटोले यांनी या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, गडचिरोली येथील साखर फाटा येथे घडलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, त्यासाठी विलंब झाल्याने कारवाईला उशीर झाला. यापुढे अशा प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. या प्रकरणी गडचिरोली जिल्हाधिकारी यांना संबंधित गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, केंद्र सरकारने खनीकर्म योजनेत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष बनवले आहे. या समितीच्या बैठका महिन्याभरात घेतल्या जाव्यात, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील.

0000