Tuesday, August 25 2026 12:04 am

अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत चौकशी करणार – मंत्री डॉ.विजयकुमार गावित

मुंबई, 03 : अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत आढावा घेऊन यामध्ये काही कसूर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य डॉ.अशोक उईके यांनी उपस्थ‍ित केलेल्या यासंदर्भातील लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री डॉ. गावित बोलत होते.

या पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, प्रवेश संख्या, शैक्षणिक पूरक साहित्य, स्टेशनरी तसेच शासन निर्णयानुसार विहीत तरतुदींची पूर्तता केली जात आहे की नाही याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ.देवराव होळी यांनी सहभाग घेतला.