Tuesday, June 30 2026 1:16 pm
latest

अटल सेतूवर आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने संरक्षक जाळी बसविणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

उच्चस्तरीय समिती नेमणार

मुंबई, 30: अटल सेतूवर होणारा प्रवास हा अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी शासनही आग्रही आहे. अटल सेतूवर आत्महत्यांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून या ठिकाणी तातडीने संरक्षक जाळी (सेफ्टी नेट) उभारण्यात येईल. अटल सेतूवर घडणाऱ्या घटना व यावर उपाय योजनांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रमोद जठार,अनिकेत तटकरे, भाई जगताप, अमित गोरखे, प्रसाद लाड, यांनी भाग घेतला.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले, अटल सेतूवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून अटल सेतू पूर्णपणे सुरक्षित राहावा आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबंधित सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. समितीमार्फत अटल सेतूवर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाईल. तसेच अटल सेतूवर संरक्षक जाळीसह गस्ती वाढवणे, देखरेख पथक आदी उपाय योजना राबविण्यात येतील.

अटल सेतूवर झालेल्या आत्महत्यांच्या घटनांची माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, २०२४ मध्ये सहा घटना घडल्या असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये सहा घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सन २०२६ मध्ये आतापर्यंत तीन घटना घडल्या असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीरता लक्षात घेऊन अटल सेतूवर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.