Saturday, May 30 2026 1:40 pm
latest

शहरात १०३ कोटींची रंगरंगोटी , ठामपा शाळेत शिक्षणाचा ‘बेरंग’

ठाणे, १५ ;शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.

एकेकाळी ठाणे महापालिकेच्या शाळांमधून सुमारे ६० हजारहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत होते तर सहा हजारांहून जास्त शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत होते, मात्र एकीकडे भ्रष्टाचाराचे प्रमाण महापालिकेत वाढत असताना दुसरीकडे मात्र या शाळांकडे आणि या शाळांमधील हजारो गरीब विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही वर्षांत येथील शैक्षणिक दर्जा घसरलाच शिवाय विद्यार्थ्यांची संख्याही घसरू लागली आहे. शाळांच्या दयनीय अवस्थेचे जिवंत उदाहरण ठामपाच्या दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र.९० मध्ये आढळून आले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आधार कार्ड शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी ही बाब उघडकीस आली.
या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यात येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याबाबत आमदार संजय केळकर यांनी येथील एकमेव शिक्षकांशी बोलून अडचणी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले असल्याची भावना येथील नागरिकांनीही बोलून दाखवली. श्री. केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ या शाळेत आवश्यक शिक्षक वर्ग नियुक्त करण्याची तसेच सोयी – सुविधा पुरवण्याची सूचना केली.

*शहरात रंगरंगोटीसाठी १०३ कोटींचा खर्च करण्यात येत आहे, याचा आनंदच आहे, पण शाळांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बेरंग करू नका, अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.*