Friday, November 14 2025 12:03 pm

कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, 30 – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गरजू तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण वर्गासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे तसेच प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी येत्या 5 जून 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने ठाणे जिल्हा कार्यालयासाठी सन 2024-25 या वित्तीय वर्षाकरिता एकूण 500 प्रशिक्षणार्थींसाठी कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी यासाठी समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी ही प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदाराची आवश्यक असलेली पात्रता –

1. अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील असावा.

2. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा.

3. अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे.

4. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या, महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

5. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे.

6. एका कंटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.

7. अर्जदारास आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल.

तसेच या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ज्या संस्थांनी कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी

केलेली आहे, अशा संस्था प्रस्ताव दाखल करु शकतील.

इच्छुक प्रशिक्षणार्थी तसेच असे प्रशिक्षण देण्यास पात्र असलेल्या संस्थांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, खारेगाव, कळवा, ठाणे (प.)400605 येथे अर्ज व प्रशिक्षणसंस्था चालकांनी त्यांचा प्रस्ताव 2 प्रतीत 5 जून 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.