Saturday, June 27 2026 10:37 pm
latest

अग्निशमन सेवा सप्ताह सुरू

महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके

ठाणे 16 – अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून रविवारी सकाळी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले.

या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील.