Wednesday, October 28 2026 8:18 pm

झेप प्रतिष्ठानतर्फे ५४ जिल्हा परिषद शाळांना संगणक वाटप; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

ठाणे, 28 : ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने झेप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील ५४ जिल्हा परिषद शाळांसाठी संगणक वाटप उपक्रम राबविण्यात आला. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे येथील स्व. मालतीबाई गंद्रे सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शिक्षक उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे आणि डिजिटल युगातील नव्या संधींचा लाभ घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

आजच्या काळात संगणक शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची महत्त्वाची गरज बनली आहे. मात्र, अनेक दुर्गम भागांतील शाळांमध्ये आवश्यक डिजिटल सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी झेप प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी आपल्या शाळांमधील परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि संगणक शिक्षणाचे महत्त्व याविषयी अनुभव व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याची संधी मिळेल, नवीन माहिती व ज्ञान मिळवता येईल आणि तंत्रज्ञानविषयक कौशल्ये विकसित करता येतील, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास तसेच भविष्यातील उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.

झेप प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, देणगीदार, हितचिंतक आणि स्वयंसेवकांचे प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला.

केवळ संगणक वाटप न करता ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने झेप प्रतिष्ठानने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात आणि कोणतेही मूल साधनांच्या अभावामुळे मागे राहू नये, या उद्देशाने प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य पुढेही सुरू राहणार आहे असे झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी सांगितले.