Wednesday, October 28 2026 10:06 pm

गावठाणांचे हक्क जपा, महापालिका मालमत्तांचे ऑडिट करा!

निरंजन डावखरे यांची आयुक्तांकडे मागणी; राबोडीत २४ तास अभ्यासिका सुरू करण्यासाठी पाठपुरावा

ठाणे, 28 – क्लस्टर पुनर्विकास योजनेत गावठाणांचा समावेश करताना मूळ रहिवाशांचे हक्क सुरक्षित ठेवावेत, ठाणे महापालिकेच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची सविस्तर माहिती संकलित करून स्वतंत्र मालमत्ता व्यवस्थापन समिती स्थापन करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केली. यासोबतच राबोडीतील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा आणि २४ तास सार्वजनिक ग्रंथालय व रात्र अभ्यासिका सुरू करण्याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी बुधवारी चर्चा केली.

ठाणे शहरातील जुन्या गावठाणांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. क्लस्टर पुनर्विकास योजनेत गावठाणांचा समावेश कोणत्या निकषांनुसार करण्यात आला, मूळ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का आणि रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व शैक्षणिक सुविधांचे नियोजन झाले आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्याची मागणी डावखरे यांनी केली. चुकीच्या निकषांनुसार योजनेत समाविष्ट झालेल्या गावठाणांबाबत नियमानुसार फेरतपासणी करावी. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुढील नियोजन करावे, असेही त्यांनी सुचविले.

महापालिकेच्या मालमत्तांची मालकी, ताबा, वादग्रस्त मालमत्ता, रेडीरेकनरनुसार मूल्य आणि संभाव्य बाजारमूल्य यांची विभागनिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण, अतिक्रमण रोखणे आणि उत्पन्नवाढीसाठी स्वतंत्र मालमत्ता व्यवस्थापन समिती स्थापन करून नोडल अधिकारी नियुक्त करावा. तसेच मालमत्तांच्या माहिती संकलनासाठी कालमर्यादा निश्चित करून कृती आराखडा सादर करावा, असे डावखरे यांनी नमूद केले.

राबोडी परिसरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. या उपक्रमासाठी डिसेंबर २०२६ आणि जानेवारी २०२७ या कालावधीत महापालिका शाळा क्रमांक ८, ११ आणि १४ मधील दहा वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली. संबंधित शाळांची उपलब्धता तपासून आवश्यक परवानग्या द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा नसलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राबोडीतील संबंधित शाळांच्या छतावरील जागेत २४ तास सार्वजनिक ग्रंथालय आणि रात्र अभ्यासिका सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. त्यासाठी जागेची संरचनात्मक सुरक्षितता तपासून पुस्तके, संदर्भ साहित्य, प्रकाशव्यवस्था, बैठक व्यवस्था आणि सुरक्षेच्या सुविधांचे नियोजन करण्याची सूचना डावखरे यांनी केली.

या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार उपस्थित होते. शहराचा नियोजनबद्ध विकास, सार्वजनिक मालमत्तांचे प्रभावी व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करावी, असे डावखरे यांनी सांगितले.