124 आस्थापनांची तपासणी; 30 किलो प्लास्टिक जप्त, 69 हजार 100 रुपयांचा दंड
ठाणे 28 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या (सिंगल युज) प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान शहरातील बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले तसेच अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत एकूण 214 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत 30 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधितांकडून 69 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आस्थापनांचे चालक आणि फेरीवाल्यांना प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे चमचे तसेच इतर सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करीत आहे. त्याऐवजी कापडी पिशव्या आणि इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
सदर कारवाईमध्ये ठाणे महानगरपालिकेचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण विभागातील अधिकारी, अतिक्रमण विभागातील अधिकारी, देखरेख कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. विविध विभागांच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या तपासणी व कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही महापालिकेच्या प्रदूषण विभागाने नमूद केले.
