Thursday, August 6 2026 2:29 am

सरकारपेक्षा मोठे काम समतोल फाऊंडेशनने केले..

गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचे कौतुकोद्गार..

ठाणे 05 : समतोल फाऊंडेशनने घर सोडून पळून आलेल्या एक लाखाहून अधिक मुलांचे मनपरिवर्तन करत राष्ट्र प्रवाहात आणले. हे काम सरकारपेक्षा मोठे असल्याचे कौतुकोद्गार गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी काढले.

ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा येथे आयोजित समतोल फाऊंडेशनचे सचिव विजय जाधव लिखित ‘हरवलेलं मुक्काम पोस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री.भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर समतोल फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार ॲड. माधवी नाईक आणि उद्वेली बुक्सचे प्रकाशक विवेक मेहेत्रे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.भोयर यांनी समतोल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. समतोल फाऊंडेशनसारख्या संस्थांमुळे समाजाचा समतोल राहतो. ज्या काळात भौतिक सुखासाठी लोक धावाधाव करत आहेत, अशा काळात आमदार संजय केळकर, विजय जाधव यांच्यासारखी माणसे समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत. अशा व्यक्तींमुळेच हा समाज तरून आहे. संस्थेने आजवर विविध कारणांनी घर सोडून पळून आलेल्या लाखो मुलांना संस्थेच्या शेल्टरमध्ये आणून त्यांचे मनपरिवर्तन केले. एक लाखाहून अधिक मुलांना त्यांचे पालक मिळवून देत त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणले. हे काम सरकारपेक्षा मोठे असल्याचे सांगत श्री.भोयर यांनी कौतुक केले. ‘हरवलेलं मुक्काम पोस्ट’ या पुस्तकात संस्थेच्या कार्याचा आढावा, लेखकाचे अनुभव, संघर्ष आणि हरवलेल्या मुलांमध्ये झालेले मनपरिवर्तन, राबविलेले उपक्रम याचा उहापोह असून ही पुस्तके मी माझ्या कार्यालयामार्फत पोलीस अधिकाऱ्यांना पाठवेन तसेच शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे श्री.भोयर यांनी सांगितले.

‘समतोल’चे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी संस्थेचे कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, हे पुस्तक काल्पनिक नसून प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा एखाद्या अपयशातून नैराश्य येते, अशावेळी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल. घर सोडून पळून आलेली मुले ही स्टेशन परिसरात राहून गुन्हेगारांच्या संपर्कात येतात आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. पण ‘समतोल’ने आजवर सुमारे एक लाख १८ हजार ४० मुलांचे मनपरिवर्तन करत त्यांना मामणोली येथील केंद्रात शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. संस्थेला देणाऱ्या हातांचे आभार मानताना त्यांनी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची आठवण सांगितली. संस्थेने दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथे दोन गाळ्यांची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र गाळ्यांचे भाडे परवडणारे नसल्याने संस्थेचे कार्य पाहून श्री.जंत्रे यांनी स्वतःच्या खिशातून पाच वर्षांचे भाडे आगाऊ भरले. असे अनेक हात पुढे येत असून संस्थेच्या अन्नदान उपक्रमाचा गेल्या नऊ वर्षांत सिव्हिल रुग्णालयातील सुमारे साडेआठ लाख रुग्ण, नातेवाईकांनी लाभ घेतल्याची माहिती देखील श्री.केळकर यांनी दिली. राजकारणाचा काही भरोसा नाही पण समाजकार्य रात्रीची सुखाची झोप देते, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.

आमदार ॲड. माधवी नाईक यांनी देखील भारावून जात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सुरुवातीला विजय जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांत आलेल्या कडू गोड अनुभवांचे कथन केले. कार्यक्रमात मनपरिवर्तन झालेल्या मुलांनी देखील त्यांचे अनुभव कथन केले. यावेळी नगरसेवक सीताराम राणे, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, विकास पाटील, सुरेश कांबळे आदी नगरसेवक, संस्थेचे हितचिंतक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.