कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकास, लोकसेवा आणि नेतृत्वाचा मंत्र
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रेरणादायी मार्गदर्शन
पर्यावरण, दर्जेदार विकास, जनसंपर्क, स्वच्छता, क्लस्टर पुनर्विकास, पायाभूत सुविधा, लोकसेवा आणि कार्यकर्ता संस्कृतीवर भर
ठाणे, 05: “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. संपत्तीपेक्षा माणसं कमवा, नागरिकांच्या फोनला प्रतिसाद द्या, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा. लोकांनी निवडून दिल्यानंतर आपण त्यांच्या सेवेत रुजू झालो, ही भावना कधीही विसरू नका,” असा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी संदेश उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना दिला.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी माजी खासदार आनंद परांजपे यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे महाराष्ट्र संघटन प्रमुख, डॉ. बालाजी किनीकर, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, गटनेते विश्वनाथ राणे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सूरज आव्हाड, डॉ. प्रकाश आवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी वृक्षारोपण केल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि अनियमित पावसामुळे पर्यावरण हा आता जगासमोरील सर्वात मोठा विषय ठरला आहे. एका दिवसात महिनाभराचा पाऊस पडतो, तर दुसरीकडे दीर्घ काळ पाऊसच पडत नाही. त्यामुळे महापालिकांनी केवळ रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे. विकासकामांमध्ये वृक्षतोड टाळावी आणि आवश्यक असल्यास त्यापेक्षा अधिक वृक्षारोपण करावे, असे त्यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना शिंदे म्हणाले की, ठाण्यात एखादे झाड तोडले गेले किंवा पाण्याची लाईन फुटली, एवढी छोटी बातमी वाचली तरी बाळासाहेब सकाळी फोन करून चौकशी करत असत. ठाण्यातील रस्ते रुंदीकरणावेळी काढलेली झाडे पुन्हा लावली आणि ती आज मोठी होऊन शहराला सावली देत आहेत. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हेच खरे नेतृत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी संघर्ष न करता समन्वयाने काम केले पाहिजे. “हे शहर माझे आहे” या भावनेतून निर्णय घेतल्यास विकास अधिक वेगाने होतो. अधिकारी शत्रू नाहीत; त्यांना विश्वासात घेऊन, नियम समजून आणि सकारात्मक संवादातून काम करून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील नेतृत्व घडवणारी संस्था असल्याचे सांगत त्यांनी येथे मिळणारे प्रशिक्षण आयुष्यभर उपयोगी पडते, असे नमूद केले. “कोणीही परिपूर्ण नसतो. शिकणे कधीही थांबवू नका,” असा संदेश त्यांनी दिला.
महापालिका अधिनियम, नगरसेवकांचे अधिकार-कर्तव्य, अर्थसंकल्प, सभागृहाचे कामकाज, स्मार्ट सिटी, क्लस्टर डेव्हलपमेंट, पुनर्विकास, विषय समित्या, सोशल मीडिया, नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक, रिंगरोड, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास यांचा अभ्यास प्रत्येक नगरसेवकाने केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे म्हणाले की, विधानसभेत ते शेवटच्या बाकावर बसत असत. प्रत्येक चर्चा लक्षपूर्वक ऐकून, अभ्यास करून आणि अनुभवातून शिकत त्यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केला.
“Chief Minister म्हणजे Chief Servant”
“मी मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो; पण मी स्वतःला कधीही मोठा समजलो नाही. माझ्यासाठी Chief Minister म्हणजे Chief Servant. आजही मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे,” असे सांगत त्यांनी पदापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले.
“आपण कार्यकर्ता आहोत, ही भावना डोक्यात कायम ठेवली पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री ही पदे तात्पुरती असतात; पण कार्यकर्ता ही ओळख कायमची असते,” असे त्यांनी सांगितले.
लोकांनी निवडून दिल्यानंतर पाच वर्षे त्यांच्या सेवेत राहणे हीच खरी लोकप्रतिनिधीची परीक्षा आहे. नागरिकांचा फोन उचलणे, नम्रपणे संवाद साधणे, त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवणे आणि त्यांना सन्मानाने वागवणे हेच पुन्हा निवडून येण्याचे खरे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक नगरसेवकाचे संपर्क कार्यालय असावे; मात्र कार्यालयापेक्षा जनतेत सतत राहणारा लोकप्रतिनिधी अधिक लोकप्रिय होतो. शिवसेनेच्या शाखा या जनतेच्या समस्या सोडवण्याची केंद्रे असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना शिंदे म्हणाले की, किसननगरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई होती. जुन्या पाईपलाईन शोधून, स्वतः खड्डे खोदून आणि पाठपुरावा करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. लोकांची समस्या आपली समजून काम केल्यामुळेच जनतेने भरभरून साथ दिली, असे त्यांनी सांगितले.
“पूर असो, दुर्घटना असो किंवा कोणतेही संकट असो, लोकप्रतिनिधीने कार्यालयात बसू नये. घटनास्थळी जाऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. फिल्डवर उतरून काम करणारा लोकप्रतिनिधीच लोकांच्या मनात घर करतो,” असे ते म्हणाले.
नगरसेवकांनी रोज सकाळी आपल्या प्रभागातील स्वच्छता, सफाई व्यवस्था, गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, फुटपाथ, उद्याने आणि नागरिकांच्या समस्या स्वतः पाहाव्यात. स्वच्छता ही फक्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून लोकप्रतिनिधीचेही उत्तरदायित्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, एसटीपी, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, उद्याने, वाचनालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते आणि नागरिकाभिमुख सुविधा यावर त्यांनी भर दिला. कल्याणमधील काळा तलावाचे सुंदर उद्यानात रूपांतर करून शहराचा चेहरामोहरा बदलल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.
मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, दुसरे विमानतळ, ठाणे-बोरिवली बोगदा, शिळफाटा-भिवंडी मार्ग, डबल डेकर रस्ते, एलिव्हेटेड कॉरिडॉर, आठ पदरी रस्ते, गायमुख-मिरा रोड मेट्रो, बदलापूरपर्यंत विस्तारलेले मेट्रो नेटवर्क अशा प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशाची वाहतूक व्यवस्था आमूलाग्र बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी विक्रमी निधी मिळवण्यात यश आले. योग्य प्रस्ताव, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि केंद्र-राज्य समन्वयामुळे राज्यात विकासाची गती वाढली, असे त्यांनी सांगितले.
नगरसेवकांनी निधीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावेत. प्रस्ताव व्यवस्थित असेल आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर निधी मिळतो. अनेक लोकप्रिय नगरसेवक याच पद्धतीने आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि संपूर्ण एमएमआरच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देताना कधीही हात आखडता घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा देशातील अत्यंत आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे सांगत त्यांनी याची काही प्रमाणात पडतात झाल्यानंतर मुसळधार पावसानंतर युद्धपातळीवर वाहतूक सुरू केल्याचा अनुभव सांगितला. समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी विशेष मार्ग, पर्यावरण संरक्षण आणि जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवल्याचेही त्यांनी नमूद केले.
अटल सेतू उभारताना फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्थलांतर बाधित होणार, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक नियोजनामुळे फ्लेमिंगोंची संख्या कमी न होता वाढल्याचे संबंधित संस्थांनीच मान्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
महापालिकेच्या प्रत्येक कामाची गुणवत्ता सर्वोच्च असली पाहिजे. वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक काम करणाऱ्या यंत्रणेलाच प्राधान्य मिळाले पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना कोणतीही माफी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहातील प्रोटोकॉल पाळा, अभ्यास करून बोला, अर्थसंकल्प वाचा, नियम समजून घ्या आणि मुद्देसूद मांडणी करा. अशा लोकप्रतिनिधींना अधिकारीही गांभीर्याने घेतात, असे त्यांनी सांगितले.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील धोकादायक इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या संकल्पनेची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून दिल्लीमध्ये तो राबवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
महापालिकांनी प्रभागनिहाय स्पर्धा आयोजित करून सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रभाग निवडावा. अशा महापालिकेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
राजकारणात किती मालमत्ता कमावली यापेक्षा किती माणसं जोडली, किती लोकांचा विश्वास संपादन केला हेच खरे यश असल्याचे सांगत त्यांनी लोकप्रतिनिधींना समाजाशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचा सल्ला दिला.
उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटवत त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले, “मी कोणाला छेडत नाही; पण मला कोणी छेडले तर मी त्याला सोडत नाही.” हा निर्धार बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेल्या संस्कारांचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपली राजकीय वाटचाल ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर उभी असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान राजकीय आयुष्यभर उपयोगी पडते. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात स्वच्छता, विकास, पर्यावरण, नागरिक संपर्क, दर्जेदार कामे आणि लोकाभिमुख प्रशासन यावर लक्ष केंद्रित करून मिळालेल्या संधीचे सोनं करावे, असे आवाहन करून त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्याचे कौतुक केले.
