Thursday, July 23 2026 2:14 am

“प्रभाग १९ बनतोय मृत्यूचा सापळा” – वारंवारच्या दुर्घटनांवरून शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांचा प्रशासनावर हल्लाबोल

ठाणे, 22 _ : प्रभाग क्रमांक १९ मध्ये सातत्याने घडणाऱ्या जीवितहानीच्या घटनांबाबत ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील कारभारावर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी सर्वसाधारण सभेत जोरदार हल्लाबोल केला. वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार, सूचना आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज प्रभाग १९ हा “मृत्यूचा सापळा” बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सभागृहात बोलताना रेपाळे यांनी प्रभागातील अलीकडील दुर्घटनांचा उल्लेख केला. गेल्या जुलै महिन्यात रायलादेवी तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अडीच वर्षीय हमदान शेख हा उघड्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला, मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला. त्यानंतर रहेजा चौक येथे २४ वर्षीय तरुणाचा प्रशासनाच्या गलथानपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. याच जुलै महिन्यात झाडाची फांदी पडून पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सर्व घटनांमधून प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.

रेपाळे यांनी स्पष्ट केले की, या सर्व धोकादायक ठिकाणांबाबत प्रशासनाला अनेक वेळा लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वेळेत उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला. पांडुरंग भुवड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वन करण्याचे सौजन्यही प्रशासनाने दाखवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वृक्ष छाटणीच्या कामातील अनागोंदीवरही त्यांनी बोट ठेवले. निविदा प्रक्रियेत झालेला विलंब, ठेकेदाराकडे अपुरे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव तसेच सार्वजनिक वृक्षांऐवजी खासगी जागा आणि बिल्डरांच्या परिसरातील वृक्षछाटणीला प्राधान्य दिल्यामुळे प्रभागातील धोकादायक वृक्षांची छाटणी वेळेत झाली नाही. या निष्काळजीपणामुळेच पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

आपत्ती व्यवस्थापन विभागावर टीका करताना रेपाळे म्हणाले, “आपत्ती व्यवस्थापन विभाग हा फक्त संदेश देण्यासाठीच आहे असे वाटते. आवश्यक यंत्रसामग्री नाही, प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, सक्षम अधिकारी नाहीत. अशा पद्धतीचा कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असून तो तातडीने बदलला पाहिजे.”

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना भावनिक आवाहन करत म्हटले, “आपण प्रत्येक दुर्घटनेनंतर श्रद्धांजली वाहणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जावे, की अशा दुर्घटना घडूच नयेत यासाठी जबाबदार, उत्तरदायी आणि संवेदनशील व्यवस्था उभी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून इतिहासात नोंद व्हावी? हा निर्णय आज या सभागृहाने घ्यायचा आहे.”