Wednesday, July 15 2026 2:52 am

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल

वर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व
आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन

पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

ठाणे, 14 : आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल असा संदेश देत ठाणे महानगरपालिकेने शहरातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक आस्थापनांना वर्षाजल संधारण (Rain Water Harvesting) प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

हवामानातील बदल, ‘एल निनो’सारख्या जागतिक हवामानविषयक घटनांमुळे अनियमित पाऊस यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

प्रत्येक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून ते भूजल पुनर्भरणासाठी वापरणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते.

वर्षाजल संधारणामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक झरे अधिक काळ पाण्याने भरलेले राहतात. तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढून पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय मिळू शकतो. शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होते, तर पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षणही साध्य होते.

याशिवाय, पावसाचे वाहून जाणारे पाणी नियंत्रित झाल्याने पूरस्थितीचा धोका कमी होण्यास मदत होते. टँकर किंवा इतर पर्यायी पाणीपुरवठ्यावर होणारा खर्चही कमी होतो. योग्य प्रक्रियेनंतर हे पाणी विविध घरगुती आणि अन्य उपयोगांसाठी वापरता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भावी पिढ्यांसाठी पाण्याचा शाश्वत साठा निर्माण करून जलसुरक्षेला बळकटी मिळते.

ठाणे महानगरपालिकेने सर्व नागरिक, संस्था व आस्थापनांनी आपल्या परिसरात वर्षाजल संधारण प्रणाली उभारून पाण्याच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. “पावसाचा प्रत्येक थेंब जपा, भविष्यातील पाणी सुरक्षित करा” हा संदेश देत महापालिकेने जलसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असे नमूद केले आहे.