परवानगी रद्द, संबंधित संस्था व स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे 14 : वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील ओसवाल पार्क, सुभाष नगर परिसरात दि. 06 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रस्ता दुभाजकामध्ये उभारण्यात आलेला कॅन्टिलिव्हर प्रकारचा अधिकृत जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली. या घटनेची ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेत संबंधित जाहिरात फलकाची परवानगी तात्काळ रद्द केली असून जाहिरात संस्था आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर जाहिरात फलक मे. रोनक ॲड या संस्थेचा अधिकृत जाहिरात फलक होता. ठाणे महानगरपालिकेच्या चौक सुशोभीकरण योजनेअंतर्गत विविध चौकांच्या सुशोभीकरणाच्या मोबदल्यात संबंधित संस्थेला हा जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, संबंधित संस्थेने जाहिरात फलकाचे अद्ययावत स्ट्रक्चरल ऑडिट करून दि.06 जून 2026 रोजी सक्षम संरचनात्मक अभियंत्याकडून जारी करण्यात आलेले ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट’ महापालिकेकडे सादर केले होते, असे प्रमाणपत्र अस्तित्वात असतानाही हा फलक कोसळल्याने महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तीय नुकसान झाले नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या घटनेनंतर संबंधित जाहिरात फलकाची परवानगी तात्काळ रद्द करण्यात आली. तसेच मे. रोनक अॅड आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२५ अन्वये चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासणीदरम्यान दोन ठिकाणी जाहिरात फलक धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी संबंधित फलकांवरील जाहिरात पत्रे तात्काळ काढून घेण्यात आली.
याशिवाय, शहरातील सर्व जाहिरात परवानाधारकांना त्यांच्या जाहिरात फलकांची संरचनात्मक मजबुती तपासणे, पावसाळ्यात आवश्यकतेनुसार जाहिरात पत्रे काढून घेणे तसेच विद्युत रोषणाई व वायरिंगची सुरक्षितता सुनिश्चित करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
ठाणे महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत असून जाहिरात फलकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच यापुढेही शहरातील सर्व जाहिरात फलकांची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरात संस्थांविरुद्ध कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे
