मुंबई, 30 : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून १ जुलै रोजी (डॉक्टर्स डे) नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. तसेच मनुष्यबळाअभावी सुरू न झालेल्या आरोग्य संस्था कार्यान्वित करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.
मंत्री आबिटकर म्हणाले की, १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून समुपदेशनाद्वारे गरजेनुसार नियुक्त्या केल्या जातील. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) पदांच्या भरतीतील न्यायालयीन अडथळेही दूर झाले असून ती प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. राज्यातील अनेक आरोग्य संस्था इमारती पूर्ण असूनही मनुष्यबळाअभावी सुरू झालेल्या नाहीत, या संस्था कार्यान्वित करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी पाच हजार नवीन पदांच्या निर्मितीस उच्चस्तरीय समिती व मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
जुन्या रुग्णालयांच्या दुरुस्ती, रंगरंगोटी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी यंदापासून प्रत्येक जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांना पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार या निधीत वाढ केली जाईल, असेही आबिटकर यांनी सांगितले. आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये प्रथमच समुपदेशनाच्या माध्यमातून पारदर्शक व्यवस्था लागू करण्यात आल्याचे सांगताना त्यांनी सिव्हिल सर्जन आणि उपसंचालक पदांवर गुणवत्तेच्या निकषांनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नमूद केले.
आरोग्य यंत्रणेच्या कामकाजात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आरोग्य वर्धिनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित आमदारांकडे सोपविण्यात येणार आहे. आमदारांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेणे आणि दर सहा महिन्यांनी त्याचा अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
