मुंबई, 29 : भिवंडी परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी यार्न डाईंग उद्योगांनी पीएनजी, सीएनजी अथवा एलपीजीसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अबू आझमी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, भिवंडी परिसरात वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे असून सुमारे २५४ उद्योग कार्यरत आहेत. यापैकी ७४ उद्योग हरित (ग्रीन) वर्गवारीतील असल्याने त्यांच्याकडून प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही. तर ५४ डाईंग उद्योग हे रासायनिक प्रक्रिया करणारे असल्याने ते ‘ऑरेंज’ वर्गवारीत मोडतात. या उद्योगांमधून पाणी व हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
यार्न डाईंग उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॉयलरमधून प्रदूषण होऊ नये यासाठी कचरा, प्लास्टिक किंवा लाकूड यांसारख्या पर्यावरणाला हानीकारक इंधनाचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याऐवजी पीएनजी, सीएनजी किंवा एलपीजीसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे निर्देश उद्योगांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्योगांना स्वच्छ इंधनाचा खर्च परवडत नसल्याची बाब समोर आली असून, त्यांना अनुदान अथवा अन्य प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत उद्योग विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शासन अत्यंत संवेदनशील असून प्रदूषणाच्या तक्रारी प्राप्त होताच तातडीने कारवाई केली जाते. मात्र कायद्याने निर्धारित प्रक्रियेनुसार प्रथम नोटीस, त्यानंतर पुढील निर्देश आणि आवश्यकतेनुसार उद्योग बंद करण्याचे आदेश अशा टप्प्याटप्प्याने कारवाई करावी लागते, असे मंत्री मुंडे यांनी नमूद केले.
मानखुर्द-गोवंडी परिसरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प तसेच एसएमएस कंपनीच्या संदर्भातही प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने सातत्याने निरीक्षण करण्यात येत आहे. एसएमएस कंपनीला स्थलांतराचे आदेश देण्यात आले असून कंपनी अंबरनाथ एमआयडीसी परिसरात स्थलांतरित होत आहे. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यास कंपनीला बाध्य करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
