बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे देशात महाराष्ट्र आणि जगात भारत एक नंबरचा झाला पाहिजे असे स्वप्न बघा
माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विध्यार्थ्यांना दिली यशाची गुरुकिल्ली
ठाणे, 29 – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे देशात महाराष्ट्र आणि जगात भारत एक नंबरचा झाला पाहिजे असे स्वप्न बघा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास पाया भक्कम करा असा सल्ला चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ठाण्यातील विधार्थ्याना दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात स्पर्धा परीक्षा आणि करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
शिवसेना ठाणे जिल्हा शाखा, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर गडकरी रंगायतन येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, युवासेना सचिव, आमदार वरून सरदेसाई, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, ठाणे पालिकेचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांच्यासह हजारो विद्यार्थी पालक, शिक्षक उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून ‘चाणक्य मंडळ परिवार’चे संस्थापक, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि विश्वस्त ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी ठाण्यातील मराठी, इंग्लिश माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता प्रत्येकाकडे
छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज हिंदुस्थान शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने छत्रपतींचा कणभर गुण प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात अंगिकारला तर बदल नक्कीच घडणार असे मत यावेळी अविनाश धर्माधिकारी व्यक्त केले. उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे, ती ओळखा असा मोलाचा सल्ला धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
धर्मवीरांचा वसा चालू ठेवण्यासाठी शिबीर
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरातील तरुण आयएएस व आयपीएस होण्याकरिता पालिकेच्या माध्यमातून चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करून दिली. तोच वसा पुढे चालू ठेवण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येते असल्याचे शिवसेना नेते राजन विचारे यांनी यावेळी सांगितले.
तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते
१०वी, १२वी आणि पदवीनंतर अचूक करिअर कसे निवडावे? स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? याविषयी तरुणांना योग्य दिशा शिवसेनेचे आमदार वरून सरदेसाई यांनी मार्गदर्शन शिबिरात दाखवली. सिद्ध करून दाखवण्याची इच्छा असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते असे मत सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केले.
