जनतेकडून पैसे गोळा करून निष्क्रिय अधिकाऱ्यांना देणार..
ठाणे 22 : राबोडी परिसरात विकासकामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उथळसर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित ११०वा जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरीक दानपेटी घेऊन उपस्थित होते. या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. राबोडी परीसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आदी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही ही कामे सुरूच राहतात, त्यामुळे या बांधकामांमागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा श्री.केळकर यांनी केला.
अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उथळसर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत. पैसे घ्या, पण कामे करा, अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
वर्तकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिणी भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली ४० वर्षे व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटीसा बजावत आहेत. जे रुंदीकरण शक्य नाही, त्याचा अट्टाहास कशाला असा प्रश्न विचारत श्री. केळकर यांनी सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना दुकानदारांवर अन्याय होऊ नये, याबाबत बजावले आहे.
गुंतवणूकदारांचे १२०० कोटी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
पोंजी आणि सागर इन्व्हेस्टमेंट कंपन्यांनी गुंतवणूकदारांची १२०० कोटींहून अधिक फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई होत असून याबाबत काही आरोपींना अटकही झाली आहे. मात्र या कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी जलदगतीने प्रक्रिया व्हायला हवी. येत्या अधिवेशनात हे मुद्दे घेऊन लवकरात लवकर गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
