ठाणे 20 : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटविण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 3778 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर हटविण्यात आले. यापुढे आचारसंहिता कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक जाहिरात पोस्टर्स, बॅनर्स, फलक विनापरवानगी लावल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी, या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, परिमंडळनिहाय पथके यांच्या समन्वयाने कडक कारवाई राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक भिंती, उड्डाणपूल, वीजखांब, बसथांबे आदी ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स व बॅनर्सवर लावणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची तसेच महापालिकेच्या वास्तूवरील कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
विनापरवानगी शहरात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर लावणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. शहरात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
