Sunday, December 21 2025 11:04 pm
latest

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पारदर्शी निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडावी : आयुक्त सौरभ राव

ठाणे 20 – 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, शांततापूर्ण व राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना महापालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित सर्व यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत ‍दिल्या.

ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज बैठक पार पडली. महापालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सौरभ बोरसे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, निवडणूकीसाठी प्रभागसमितीनिहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 1,2,3 तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असून कोणत्याही प्रकारचा नियमभंग, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर प्रचार, अनधिकृत खर्च, जाहिरातबाजी किंवा शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रियेच्या दृष्टीने शहरातील सर्व मतदान केंद्रांची भौतिक सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ व्यवस्था, तसेच महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी यांना संपूर्ण प्रशिक्षण तसेच ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक, साठवणूक व हाताळणी ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रभागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, गस्त वाढविणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांचे तात्काळ निवारण करून वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

याशिवाय, आचारसंहिता कालावधीत अनधिकृत बांधकाम, जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स, पैशांचे किंवा वस्तूंचे वाटप यासारख्या बाबींवर शून्य सहनशीलतेची भूमिका ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करून आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महापालिकेचे सर्व विभाग, पोलीस प्रशासन व अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.