Monday, December 22 2025 3:00 am
latest

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर 11 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील आर्थिक व इतर गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकासनिधी मान्यतेविना खर्च केल्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, किशोर दराडे, सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकासकामांची गुणवत्ता यासाठी कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कृषी परिषद यांची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र अशी मान्यता न घेण्यात आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील आर्थिक व इतर गैरप्रकारांची चौकशी करण्याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. हा अहवाल राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कामकाज संदर्भात संबंधित विधिमंडळ सदस्यांसमवेत लवकरच बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.