Monday, December 22 2025 3:01 am
latest

कचरा समस्येवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

तर पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू – अभिजीत पवार

ठाणे, 21 – गेल्या चार दिवसांपासून कळवा , मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले. कचरासमस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू, असा इशारा यावेळी अभिजीत पवार यांनी दिला.

डम्पिंग ग्राऊंड नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही. परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागला आहे. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे. हा सराव कचरा अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पुजा शिंदे- विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतला. त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली.

दरम्यान, या संदर्भात अभिजीत पवार यांनी, जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे. आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे. पण, जर जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा दिला.