Monday, December 22 2025 3:00 am
latest

ठाण्यात ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ‘हमदान’वर ज्युपिटरमध्ये उपचार
ठाणे, 21- आईसोबत रस्त्यावरून चालत जाताना अचानक तब्बल २० फुटी उघड्या गटाराच्या आत दोन वर्षीय हमदान कुरेशी पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर घडली. या घटनेनंतर स्थानिक गोपी नामक तरुणाने प्रसंगावधान राखत या अंधारमय गटारात उडी घेतली. त्याने चिमुकल्या हमदानला बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले – जाधव यांनी धाव घेत हमदानला नजीकच्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र या घटनेची माहिती रेपाळे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हमदानला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला आहे.

ठाण्यातील तीन हात नाका येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर स्ट्रॉम वॉटर पाईपलाईनकरिता असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये हमदान पडला. हे पाहताच त्याच्या आईने मदतीसाठी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून गोपी नामक तरुणाने गटारात उडी घेतली. मात्र गटारात अंधार असल्याने चाचपडत त्याने हमदानचा शोध घेतला. त्याचवेळी शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका नम्रता भोसले – जाधव प्रभागातील विविध कामांचा आढावा घेत होत्या. त्यांनी घटनास्थळी दाखल होत विविध यंत्रणांना फोनाफोनी केली. त्यामुळे सूत्रे वेगाने फिरली. तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश जामनोर, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान बांधकाम विभागाचे व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दाखल झाले. गटाराचे पाणी पोटात गेल्याने हमदानला उपचाराकरिता प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. अखेर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याला ज्युपिटर रुग्णालय येथे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे चिमुकल्याचा प्राण वाचला.

* चेंबर बंद केले
उघडे ठेवण्यात आलेल्या चेंबरचे झाकण लोखंडी पाईपमुळे बंद होत नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा पाईप ग्रँडर व गॅस कटरच्या सहाय्याने कापून बाजूला करण्यात आला असून चेंबर बंद करण्यात आले आहे. कोणत्याही कामासाठी गटार उघडे ठेवणे चुकीचे असून याबाबत ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती रेपाळे यांनी दिली.