आमदार संजय केळकर यांना निवेदन..
ठाणे, 21 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजुबाजूच्या गृहसंकुलांतील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेतली. शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचे श्री. केळकर म्हणाले.
कासारवडवली येथील पारिजात गार्डन्स, रोझा गार्डेनिया, हावरे सिटी प्लॅटनियम, भक्ती पार्क, विहंग गार्डन, प्राईड, साईनाथ नगर, पुष्पांजली सोसायटी आदी गृहसंकुलांतील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी येत असतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो. परंतु दिवसेंदिवस या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पालापाचोळाही तसाच पडलेला असतो. स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे. वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. व्यायामाचे साहित्यही खराब झाले आहे. माळी, सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे.
येथील नागरिकांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले. याबाबत उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून हा समस्या दूर करणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केले. या प्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.
ठाण्यातील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील श्री.केळकर यांची भेट घेतली. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिव्यांग महिलांना मिळत नसून काही त्रुटींमुळे त्यांचे अर्ज रद्द होत आहेत. शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या देखील मार्गी लावणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेसंबंधित तक्रारींसह विविध तक्रारींची निवेदने जिल्ह्यातून प्राप्त झाली. यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, प्रशांत गावंड, निलेश पाटील, महेश कदम, श्रुती महाजन, जितेंद्र मढवी, दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.
