Monday, December 22 2025 7:35 pm
latest

पुनर्विकास योजनेतील खोल्या दहशतीने विक्री प्रकरणी ‘आयपीएस’ अधिकाऱ्यामार्फत चौकशी — मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 18 : विलेपार्ले (पश्चिम) येथील प्रेमनगर गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत गरीब झोपडीधारकांच्या खोल्या धमकावून, दबाव टाकून परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणाची भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीमती मनीषा कायंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.

मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, या योजनेचे विकासक यांनी सुरुवातीला केवळ दोन वर्षे भाडे दिल्यानंतर, पुढील सहा वर्षांत कोणतेही भाडे दिलेले नाही. अधिवेशनात नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील तरतुदीनुसार, अशा विकासकांवर भाडे वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या योजनेला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मंजुरी मिळाली असून, एकूण १४०७ झोपडीधारकांपैकी ७५३ झोपडीधारक पात्र ठरले आहेत. अधिक रहिवासी पात्र आहेत का याबाबत तपासणी केली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

योजनेतील पुनर्वसन इमारतीचे तळमजला अधिक १२ मजले एवढ्या उंचीचे आराखडे मंजूर करण्यात आले असून, सद्यस्थितीत जोत्यापर्यंतचेच बांधकाम पूर्ण होऊन त्यानंतर काम बंद आहे. ही परिस्थिती गंभीर असून, शासनाने याची दखल घेतली आहे.