Monday, December 22 2025 9:50 pm
latest

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, 16 : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर सचिवाचा पदभारही काढण्यात येईल, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.

या प्रकरणावर सदस्य संजय खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री रावल म्हणाले की, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी बाजार समितीच्या कामकाजाची चौकशी केली असून संबंधित चौकशी अहवालावर समितीकडून मागविण्यात आलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे दोषींविरुद्ध आर्थिक वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथे रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी संचालक मंडळातील 17 सदस्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर अंतरिम कार्यवाही करता येईल, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निर्णयानंतर अंतिम कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री.रावल यांनी स्पष्ट केले .