Tuesday, December 23 2025 3:11 am
latest

वाकला (चांदेश्वर) प्रकल्पासाठी शासन सकारात्मक – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 16 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकला (चांदेश्वर) प्रकल्पाची (ता. वैजापूर) २.०१ दलघमी पाण्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या निर्मिती बाबत शासन सकारात्मक असून यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

वाकला प्रकल्पाबाबत सदस्य रमेश बोरनारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य संजना जाधव यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री महाजन म्हणाले, एकात्मिक राज्य जल आराखडा 2018 व 2024 मधील तापी खोऱ्यातील प्रकल्प यादीत भविष्यकालीन प्रकल्पामध्ये वाकला प्रकल्पासाठी 2.01 दलघमी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र हा प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नियोजित आहे. मन्याड प्रकल्प हा गिरणा उपखोऱ्यातील पाण्याच्या तूट असलेल्या खोऱ्यात आहे.

तसेच या प्रकल्पावर आठ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मन्याड प्रकल्पात १३.९ दलघमी पाण्याची तूट आहे. याच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाकला प्रकल्प केल्यास पाण्याची तूट अधिक वाढेल. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार करीत वाकला प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.