Tuesday, December 23 2025 7:05 am
latest

नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को – ऑप बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसीबी मार्फत चौकशी – गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, 15 : नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी आणि यु.बी. इंजिनिअरींगचे मुख्य वित्तीय अधिकारी व इतर संबंधित यांनी आपसात संगनमत करुन सन २०१८ ते २०२१ यादरम्यान बँकेच्या गिरगाव शाखेतील यु.बी. इंजिनिअरींग कंपनीचे अवसायक यांनी बंद केलेले बँक खाते मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या बनावट पत्राच्या आधारे उघडून व सिग्नेटरी अथॉरिटीमध्ये बदल करुन त्यात आर्थिक व्यवहार केले. याबाबत १.८३ कोटी रुपये इतरत्र वळविली असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या असून या प्रकरणाचा तपास करणारा पोलीस अधिकारी यांचेही बँकेसोबत संबंध असल्याची तक्रार असल्याने या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी गृह राज्यमंत्री कदम यांनी माहिती दिली.

या बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर विधानपरिषदेत स्पष्टीकरण देताना राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याविरुद्ध कुठल्याही आर्थिक देवाण-घेवाणीचा लेखी पुरावा चौकशी दरम्यान मिळालेला नाही. तथापि या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीची त्यावेळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी चौकशीस योग्य दिशा दिली नाही. म्हणूनच त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासनाने आवश्यक ती कारवाई केली आहे.

बँकेसंदर्भात अधिकची माहिती देताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, बँकेचे फ्रीज झालेले १.८३ कोटी रुपये अनधिकृतपणे डी-फ्रीज करून काढण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही बाब उघड झाल्यानंतर बँकेने संपूर्ण रक्कम व्याजासहित परत केली. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संबंधित बँकेवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. या बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि त्यांची पत्नी (बँकेच्या चेअरमन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे ४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले असून चौकशी सध्या सुरू आहे.