Monday, December 22 2025 8:33 pm
latest

जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू – कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुंबई, 09 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जालना उपविभागाअंतर्गत शेडनेट हाऊस या घटकांची अंमलबजावणी करताना उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी चौकशी प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण होणार असून चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत प्रश्न विचारला होता. सदस्य सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी यात उपप्रश्न विचारले, त्यावेळी ते बोलत होते.

कृषिमंत्री श्री.कोकाटे यांनी सांगितले की, उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना 10 जुलै 2023 रोजी झालेल्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर श्रीमती चव्हाण यांना उपविभागीय कृषी अधिकारी या पदावरून अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली. तथापि, पोकरा योजनेत शेडनेटसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील 3258 शेडनेटपैकी 2358 शेडनेटची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित 900 प्रकरणांची तपासणी पुढील 15 दिवसांत पूर्ण केली जाईल.