मुंबई, 08 :- अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी अपेक्षित निधी मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी निधीची मागणी पुरवणी मागणीतून पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य विभागाचे एक महत्त्वाचे केंद्र असून, कॅथलॅबचे काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. हॉस्पिटलमधील ऑपरेटिव्ह डॉक्टर्सच्या मानधनवाढीबाबत सदस्य विक्रम काळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, विभागाच्या नियमांनुसार त्याला मान्यता देण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील निधीच्या वितरणात अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, या योजनेमधून शासकीय रुग्णालयांना सध्या फक्त 12 टक्के निधी मिळतो. त्यामध्ये वाढ होऊन 50 टक्के पेक्षा जास्त निधी मिळावा, यासाठी नव्या धोरणावर काम सुरू असून, ते लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.
सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे घेणे हा गंभीर प्रकार असून यावर तत्काळ चौकशी सुरू करण्यात येईल.
