Monday, December 22 2025 12:19 pm
latest

प्रयोगशाळेत ‘कोण नामदेव ढसाळ?’

मुंबई 20 कोण नामदेव ढसाळ? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? याचं ठसठशीत उत्तर प्रयोगशाळा घेऊन आली आहे. ‘नामदेव ढसाळ’ माहीत असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वांसाठीच प्रयोगशाळेने रविवार, २२ जूनला दुपारी ४:०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे एक विशेष मैफल आयोजित केली आहे. अभिनेत्री चिन्मयी सुमीत, दिग्दर्शक हेमंत ढोमे, शाहीर संभाजी भगत, कवयित्री नीरजा, डॉ. प्रज्ञा दया पवार, अभिनेता कैलास वाघमारे, दीपक राजाध्यक्ष, नेहा कुलकर्णी आणि युवराज मोहिते यांसारखी दिग्गज मंडळी एकत्र येऊन कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांतील विद्रोहाचा जागर करणार आहेत.

या कार्यक्रमात वरील सर्व मान्यवरांकडून कवी नामदेव ढसाळ यांच्या कविता सादर होतील. तसेच काही दुर्मिळ चित्रफिती आणि आठवणी यांच्याद्वारे नामदेव ढसाळ यांच्या विचारांना उजाळा देण्यात येणार आहे. तर गायक नंदेश उमप यांच्या दमदार सादरीकरणाने सांगता होईल. युवराज मोहिते यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा कार्यक्रम प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी गौरवलेला आहे. तसेच कलाविश्वातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

प्रयोगशाळा हि संस्था कायमच असे प्रयोगशील आणि काळाची गरज असणारे प्रयोग प्रेक्षकांसाठी घेऊन येते. त्यापैकीच हे नवे पुष्प म्हणजे ‘कोण नामदेव ढसाळ?’. आपल्या विद्रोही लेखणीने ज्यांनी अनेकांचे धाबे दणाणून सोडले, वेळप्रसंगी व्यवस्थेलाच धारेवर धरले अशा महाकवीचा सेन्सॉर बोर्डाला आणि व्यवस्थेला पडलेला विसर हि अस्वस्थ करणारी बाब आहे. इथल्या सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातल्या जखमा ज्यांच्या कवितेतून जगापुढे आल्या अशा महाकवीची नव्याने ओळख पटवून देण्याची गरज आहे, म्हणूनच हा विचारांचा जागर. प्रवेशिका मूल्य – १०० रुपये असून प्रवेशिकांसाठी संपर्क ९००४४९३०६१ साधावा