Monday, December 22 2025 2:11 pm
latest

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 13 :- कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने १५ दिवसाच्या आत घेतला नाही, तर जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेल, या जागेबाबत त्यापुढील कार्यवाही शासनस्तरावरुन करण्यात येईल, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले व उप नगराध्यक्ष संतोष मेहत्रे उपस्थित होते.

कर्जत तालुका क्रीडा संकुलासाठी भांडेवाडी येथील जागेला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बर्गेवाडी अथवा इतर पर्यायी दोन ते तीन ठिकाणांची जागेची मागणी तालुका क्रीडा संकुल समितीने करावी, इतर तीन ते चार जागेचे सुयोग्य पर्याय सुचविण्यात यावेत, तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडून हे पर्याय तपासून घेण्यात यावेत, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

बैठकीस क्रीडा आयुक्त शितल उगले दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. तसेच महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाये उपस्थित होते.