Monday, December 22 2025 11:40 am
latest

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पाटण 11- सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील सार्वजनिक रस्ते,मंदिरे,रुग्णालये,एसटी बसस्थानक अशा ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पसारा आणि अस्वच्छता असल्याचे दस्तुरखुद्द राज्याच्या पर्यटनमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आल्यामुळे मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलीस,महसूल आणि ग्राम विकास विभागाची बैठक घेतली.
या बैठकीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात होत आहेत त्या संस्थांनी तातडीने दखल घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. गट विकास अधिकारी पाटण व मुख्याधिकारी पाटण नगरपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात एका स्वतंत्र पथकाची नियुक्ती करणेबाबत सूचित केले. तसेच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्ती ना तत्काळ नोटीसा काढाव्यात. याबाबत आवश्यक ती जनजागृती देखील करावी. तसेच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. यानंतरही कुणी ऐकत नसेल तर प्रसंगी अशी दुकाने किंवा हॉटेल सील करण्याचा देखील पर्याय वापरण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. प्रांत अधिकारी पाटण व उपविभागीय पोलिस अधिकारी पाटण यांनी या कार्यवाहीचे संपूर्ण नियंत्रण करावे.तसेच या मुद्द्यासंदर्भात प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांची तत्काळ बैठक घेण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. सुरवातीला पाटण तालुक्यात राबविण्यात येनारी ही मोहीम नंतर च्या काळात संपूर्ण सातारा जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून घ्याव्यात त्यानंतर ही अस्वच्छता दिसून आल्यास अथवा संबंधित व्यक्तींनी रात्री अपरात्री कचरा टाकल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यटन मंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
सदर बैठकीस पाटण मतदारसंघातील महसूल ,पोलिस व ग्रामविकास विभागाचे विविध अधिकारी हजर होते.