ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे कोणाचे शिक्षण राहू नये यासाठी संदीप बिरवटकर यांनी कायमच गरजूंना आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या सर्व सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने ते ही आजही प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना निश्चितच यश येत असून समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून नुकतेच कोकण मराठी पत्रकार संस्थेच्यावतीने संदीप बिरवटकर यांना समाजभूषण पुरस्कार देवून गौरविले.
यावेळी गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम त्यावेळी दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर , कोकण मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर , अनिलराज रोकडे , दिलीप देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो, आणि हा छंद मी आजवर जोपासत आलो आहे, समाजातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून मी आपल्या गावासाठी सामाजिक कार्य करीत आहे. समाजसेवेचा हा छंद जोपासताना मला कुटुंबांची साथ आहे, त्यामुळेच मी हे करत असून माझे काम मी शेवटपर्यत करत राहणार असून आज झालेल्या सत्काराने जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे उद्गगार संदीप बिरवटकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या मनोगतात आपल्या मातीत अशी रत्न आहेत की त्यांना समाजसेवेचा ध्यास घेतला आहे. आज ही रत्न या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने एखाद्या ताऱ्यासारखी समोर आली आहेत. संदीप बिरवटकर यांच्या या कार्याला शक्य तेवढी मदत करता येईल तेवढी मदत निसंकोचपणे करण्याचा निश्चित प्रयत्न करेन असे श्री. कदम यांनी नमूद केले. आपल्या बाबांनी शिक्षण कसे पूर्ण केले. शिक्षण हे किती महत्वाचे आहे. ते प्रत्येकाने घेतले पाहिजे. विशेषतः आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षण पासून वंचित राहू नये याबद्दलची त्यांची तळमळ आम्ही पाहतो असून वडिलांची गावातील मातीशी असलेली ओढ संदीप बिरवटकर यांच्या कन्येनी उपस्थितांसमोर मांडली.
