मुंबई, 18 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी २.८५ कोटी रुपायांचा आणि पायाभूत सुविधांचा १४.३५ कोटी रुपयांचा असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी सदस्य अभिजीत वंजारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
डाळवर्गीय पिके आणि कडधान्यच्या संशोधनामध्ये बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे महत्वाचे योगदान आहे. या केंद्राच्या माध्यमातून तूर, हरभरा, उडीद या पिकांची देशभरात मागणी असलेली अनेक बियाणे तयार करण्यात आली आहेत. चांगले उत्पादन देणारी ही बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे या केंद्राच्या पायाभूत सुविधांसह संशोधनासाठीही शासन अर्थसहाय्य करत आहे. या केंद्राचे दोन प्रस्ताव असून या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देऊन केंद्रास निधी दिला जाईल. तसेच या केंद्रात तयार होणारी बियाणे स्थानिक शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
