Monday, December 22 2025 9:23 pm
latest

एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेची कारवाई

१००२ दुकानांची केली तपासणी, ७८ किलो प्लास्टिक जप्त

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट आणि माजिवडा-मानपाडा या तीन प्रभाग समिती क्षेत्रात १००२ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात ७८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय कारवाई सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रातही कारवाई केली जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.

दरम्यान, ०१ एप्रिल, २०२४ ते ०६ मार्च, २०२५ या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेण्यात आली. त्यात, एकूण ४१८० आस्थापनांना भेट दिली. त्यातून २१३९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर, दंडापोटी १३ लाख ५६ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले.