Sunday, March 15 2026 7:22 pm

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांचे पुनर्वसन लवकरच पूर्ण होणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 12: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २५ हजारपेक्षा जास्त अतिक्रमकांचे लवकरच संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना वन मंत्री नाईक बोलत होते.

राष्ट्रीय उद्यान होण्यापूर्वी या ठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांचा हा मूळ प्रश्न असल्याचे सांगून वन मंत्री नाईक म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील ११ हजार ३५९ पैकी फक्त २९९ सदनिकांचे वाटप शिल्लक आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनासाठी म्हाडाच्या माध्यमातून सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या मुंबईतील व ठाणे जिल्ह्यातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागा ताब्यात आल्यानंतर सदनिका बांधकामाचे काम सुरू होईल.

वन मंत्री नाईक म्हणाले की, ज्या पात्र लाभार्थींनी ७ हजार रुपये भरलेले आहेत त्यांना सदनिका देण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच या पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास या विषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरे कॉलनी येथील १२० एकर जागेवर आदिवासी समाजातील लोकांना प्राधान्याने घरे देण्यात येतील. तर उर्वरित लोकांना उपलब्धते प्रमाणे सदनिकांचे वाटप केले जाईल.